सिरोंचा पोलिसांकडून सायबर सुरक्षेबाबत जनजागृत सिरोंचा, दि. ११ ऑक्टोबर : महाराष्ट्र सायबर सुरक्षा जनजागृती महिन्यानिमित्त सिरोंचा पोलीस स्टेशनच्या वतीने शनिवारी (दि. १०) स्थानिक बाजार समिती परिसर, मंडई आणि बसस्टॉप चौक येथे नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस अधीक्षक एम. रमेश व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुधाळ यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सुरक्षित डिजिटल बँकिंग, UPI व्यवहार, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, बनावट लिंक आणि सोशल मीडियाचा सुरक्षित वापर याबाबत माहिती देण्यात आली.नागरिकांनी OTP, ATM PIN, CVV व UPI PIN कोणालाही सांगू नये, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये आणि संशयास्पद ऑनलाइन व्यवहारांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले. सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असेही सांगण्यात आले.या जनजागृती कार्यक्रमात सुमारे २० ते २५ नागरिक व पत्रकार उपस्थित होते. नागरिकांनी डिजिटल व्यवहार करताना सतर्क राहून सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करावे, असे आवाहन सिरोंचा पोलिसांनी केले
