डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहा!
सिरोंचा पोलिसांकडून भगवंतराव ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षिततेचे धडे
संपादक सुरेश तिपट्टीवार | सिरोंचा
सिरोंचा, दि. १२ ऑक्टोबर : सरकारी अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना धमकावणे आणि ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सिरोंचा पोलिसांकडून विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यात आली. भगवंतराव ज्युनियर कॉलेज, सिरोंचा येथे सोमवारी इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुळ राज, अपर पोलीस अधीक्षक अहेरी हर्षवर्धन बी. जे. आणि सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. सिरोंचा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुधाळ यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगारीचे विविध प्रकार आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांची माहिती दिली.
सरकारी अधिकारी असल्याचे भासवून आर्थिक फसवणूक
पोलीस, सीबीआय, ईडी, कस्टम्स किंवा आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना फोन अथवा व्हिडिओ कॉलद्वारे धमकावले जाते. ‘तुमच्या नावावर गुन्हा दाखल आहे’, ‘तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाला आहे’, ‘तुमच्या कुटुंबातील व्यक्तीला अटक करण्यात आली आहे’ अशा भीतीदायक बाबी सांगून नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जातो, असे पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुधाळ यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
फसवणूक करणारे बनावट ओळखपत्रे, सरकारी लोगो आणि गणवेशाचा वापर करून नागरिकांचा विश्वास संपादन करतात. त्यानंतर तपासाच्या नावाखाली पैसे हस्तांतरित करण्यास सांगतात. मात्र, ‘डिजिटल अरेस्ट’ नावाची कोणतीही कायदेशीर अटक प्रक्रिया अस्तित्वात नाही, असे स्पष्ट करत अशा धमक्यांना घाबरू नये, असे आवाहन त्यांनी केले.
ओटीपी, पासवर्ड आणि बँकिंग माहिती देऊ नका!
विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांनी अनोळखी व्यक्तींना ओटीपी, एटीएम पिन, पासवर्ड, बँक खात्याची माहिती किंवा वैयक्तिक तपशील देऊ नयेत. सरकारी अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीची अधिकृत माध्यमातून खात्री केल्याशिवाय कोणताही आर्थिक व्यवहार करू नये, असा महत्त्वपूर्ण सल्ला यावेळी देण्यात आला.
सायबर फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, अशी माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.
७० विद्यार्थ्यांचा सहभाग; सायबर सुरक्षिततेची शपथ
व्याख्यानादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधून विविध उदाहरणांच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांचे स्वरूप स्पष्ट करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतःसह पालक, नातेवाईक आणि मित्रांनाही सायबर सुरक्षिततेबाबत जागरूक करावे, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षिततेची शपथ घेतली.
या कार्यक्रमाला भगवंतराव ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक के. एम. दुर्गम, तिरुमल सर, साजिद शेख, संदीप खोब्रागडे, प्राध्यापिका कु. स्वाती येनमवार, कु. नुसरत शेख यांच्यासह सुमारे ७० विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
सायबर गुन्हेगारीपासून बचाव करण्यासाठी जागरूकता, सतर्कता आणि वेळेत तक्रार नोंदविणे महत्त्वाचे आहे, हा संदेश या जनजागृती कार्यक्रमातून देण्यात आला.
