कोइंदुळ गावात नालेसफाईला सुरुवात; CPI च्या पाठपुराव्याला यश!
गावकऱ्यांनी बैठकीत मांडली समस्या; प्रशासनाकडे निवेदन देत नालेसफाईसाठी केला पाठपुरावा
गडचिरोली / एटापल्ली तालुका प्रतिनिधी : गिरीश डी. नरोटे
एटापल्ली तालुक्यातील ग्रामपंचायत चोकेवाडा अंतर्गत येणाऱ्या कोइंदुळ गावातील नालेसफाईच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. गावातील नाल्यांमध्ये कचरा आणि गाळ साचल्यामुळे तसेच सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी गावकऱ्यांनी बैठक घेऊन भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) च्या पदाधिकाऱ्यांकडे मदतीची मागणी केली होती.
गावकऱ्यांच्या मागणीची दखल घेत CPI च्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन पंचायत समिती एटापल्लीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले. कोइंदुळ गावातील नाल्यांची तातडीने स्वच्छता करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली होती. त्यानंतर नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
नागरिकांच्या मूलभूत समस्यांसाठी CPI कटिबद्ध
यावेळी CPI चे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले, “गावातील नागरिकांच्या समस्या सोडविणे हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे मुख्य उद्दिष्ट आहे. कोइंदुळ गावातील नागरिकांनी बैठकीसाठी आम्हाला बोलावून नालेसफाईच्या समस्येबाबत मदत मागितली होती. आम्ही या समस्येची दखल घेऊन प्रशासनाकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला. त्यानंतर नालेसफाई सुरू झाली, ही समाधानाची बाब आहे. नागरिकांच्या हक्कांसाठी आणि गावातील मूलभूत समस्या सोडविण्यासाठी CPI यापुढेही जनतेसोबत राहून संघर्ष करेल.”
नियमित स्वच्छतेची मागणी
गावात नालेसफाईचे काम पूर्ण करून सांडपाण्याचा योग्य निचरा करावा, डास प्रतिबंधक फवारणी करावी आणि गावात नियमित स्वच्छता राखावी, अशी मागणी CPI च्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे.
या पाठपुराव्यात CPI चे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सदस्य कॉ. सुरज जक्कुलवार तसेच कोइंदुळ गावातील नागरिक सहभागी झाले होते.
