बालाजी गावडे यांची पेरमिली जन आरोग्य समितीच्या पदसिद्ध सदस्यपदी निवड
आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या निर्देशाने महत्त्वाची जबाबदारी
प्रतिनिधि :– तिरुपति मडावी
गडचिरोली / अहेरी : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव तथा येरमनारचे माजी सरपंच बालाजी गावडे यांची प्राथमिक आरोग्य केंद्र, पेरमिली येथील जन आरोग्य समितीच्या पदसिद्ध सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या निर्देशानुसार ही निवड करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
या निवडीमुळे पेरमिली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांवर लक्ष ठेवणे, आरोग्य सेवांशी संबंधित समस्या समितीसमोर मांडणे तसेच आरोग्य सेवा अधिक प्रभावी होण्यासाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी बालाजी गावडे यांच्यावर राहणार आहे.
ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे महत्त्वाचे आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांची उपलब्धता, औषधोपचार, रुग्णांच्या अडचणी आणि आरोग्यविषयक योजनांची अंमलबजावणी याबाबत जन आरोग्य समितीच्या माध्यमातून लक्ष दिले जाण्याची अपेक्षा आहे.
बालाजी गावडे यांच्या निवडीमुळे पेरमिली परिसरातील आरोग्यविषयक प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडण्याची संधी मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
