अतिक्रमण पंजी जळाल्याने वनहक्क दाव्यांमध्ये अडचणी; बुर्गी ग्रामस्थांचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना निवेदन
तलाठी कार्यालयातील २००८ मधील दस्तऐवज जळाल्याचा परिणाम; अतिक्रमण पंजी उपलब्ध करून देण्याची ग्रामस्थांची मागणी
गडचिरोली | एटापल्ली तालुका प्रतिनिधी : गिरीश डी. नरोटे दिनांक : १६ ऑक्टोबर २०२६
एटापल्ली तालुक्यातील मौजा बुर्गी येथील ग्रामस्थांना अतिक्रमण पंजी उपलब्ध नसल्यामुळे वनहक्क दाव्यांचे प्रस्ताव दाखल करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी शुक्रवार, दिनांक १६ ऑक्टोबर रोजी अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे निवेदन सादर केले. तसेच तहसीलदार कार्यालय, एटापल्ली येथेही निवेदन देऊन संबंधित प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, साजा क्रमांक १७, सेवारी अंतर्गत जवेली (खुर्द), जिजावंडी, पिपली, बुर्गी (म), वेडमागड आदी गावांचा समावेश होता. या साजाची पुनर्रचना होण्यापूर्वी संबंधित गावांचा या साजामध्ये समावेश होता, असे ग्रामस्थांनी नमूद केले.
सन २००८ मध्ये तलाठी कार्यालयात असलेले दस्तऐवज आगीत जळून खाक झाले. यामध्ये अतिक्रमण पंजीचाही समावेश असल्याने संबंधित नोंदी उपलब्ध नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परिणामी, वनहक्क कायद्यांतर्गत दावे व प्रस्ताव सादर करताना आवश्यक कागदपत्रांचा अभाव जाणवत असून, ग्रामस्थांना प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित नोंदींची पडताळणी करून अतिक्रमण पंजी उपलब्ध करून द्यावी, तसेच वनहक्क दावे दाखल करण्यासाठी आवश्यक सहकार्य व योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे.
निवेदन देताना ग्रामस्थांची उपस्थिती
यावेळी जवेली (खुर्द) ग्रामपंचायतीचे सरपंच मुन्ना भाऊ पुंगाटी, बुर्गीचे पोलीस पाटील दिलीप नरोटे, वनहक्क समितीचे सदस्य कन्ना नरोटे यांच्यासह देवाजी पुंगाटी, येशू लेकामी, दसरू पुंगाटी, करण पुंगाटी, किशोर मट्टामी, सोमा वेळदा, अनिल हिचामी, राहुल लेकामी, आभाष गोटा, नरेश वाचामी, चैतू गोटा आणि गोमजी मट्टामी उपस्थित होते.
अतिक्रमण पंजीअभावी वनहक्क दाव्यांची प्रक्रिया रखडू नये, यासाठी संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
