अतिक्रमण पंजी जळाल्याने वनहक्क दाव्यांत अडचणी; बुर्गी ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन
सन २००८ मध्ये तलाठी कार्यालयातील दस्तऐवज जळाल्याचा दावा; अतिक्रमण पंजी उपलब्ध करून देण्यासह अडचणी दूर करण्याची मागणी
एटापल्ली | प्रतिनिधी : गिरीश डी. नरोटे
एटापल्ली : तालुक्यातील मौजा बुर्गी येथील ग्रामस्थांनी अतिक्रमण पंजी उपलब्ध नसल्यामुळे वनहक्क दावे सादर करताना अडचणी निर्माण होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. या समस्येवर तोडगा काढून आवश्यक सहकार्य व दिलासा मिळावा, या मागणीसाठी शुक्रवार, दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी ग्रामस्थांनी तहसील कार्यालय, एटापल्ली येथे माननीय तहसीलदार यांना निवेदन सादर केले.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, साजा क्रमांक १७, सेवारी अंतर्गत जवेली (खुर्द), जिजावंडी, पिपली, बुर्गी (म), वेडमागड आदी गावांचा समावेश पूर्वीच्या साजा रचनेत होता. या साजाची पुनर्रचना होण्यापूर्वी सन २००८ मध्ये तलाठी कार्यालयातील सर्व दस्तऐवज जळून खाक झाल्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये अतिक्रमण पंजीचाही समावेश असल्याने संबंधित नोंदी उपलब्ध होत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.
अतिक्रमण पंजी उपलब्ध नसल्यामुळे वनहक्क दाव्यांचे प्रस्ताव दाखल करताना आवश्यक कागदपत्रे व पुरावे सादर करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे संबंधित प्रकरणांचा विचार करून पर्यायी नोंदी, उपलब्ध अभिलेख किंवा नियमानुसार आवश्यक कार्यवाहीबाबत मार्गदर्शन करावे आणि वनहक्क दावे दाखल करण्यातील अडथळे दूर करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली.
या वेळी जवेली (खुर्द) ग्रामपंचायतीचे सरपंच मुन्ना भाऊ पुंगाटी, बुर्गीचे पोलीस पाटील दिलीप नरोटे, वनहक्क समिती सदस्य कन्ना नरोटे यांच्यासह देवाजी पुंगाटी, येशू लेकामी, दसरू पुंगाटी, करण पुंगाटी, किशोर मटटामी, सोमा वेळदा, अनिल हिचामी, राहुल लेकामी, आभाष गोटा, नरेश वाचामी, चैतू गोटा आणि गोमजी मटटामी उपस्थित होते.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
अतिक्रमण पंजीसारख्या महत्त्वाच्या अभिलेखांच्या अनुपलब्धतेमुळे वनहक्क दावेदारांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने या प्रकरणात तहसील प्रशासनाने लक्ष घालून उपलब्ध शासकीय अभिलेखांची तपासणी करावी आणि नियमानुसार योग्य मार्ग काढावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
