एटापल्लीतील शासकीय पेट्रोल पंपावर मूलभूत सुविधांचा अभाव; नागरिकांची नाराजी!
१५ ते २० वर्षांपासून सुरू असलेल्या पेट्रोल पंपावर स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याची तक्रार; संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी
गडचिरोली | एटापल्ली | तालुका प्रतिनिधी : गिरीष डी. नरोटे
एटापल्ली : एटापल्ली तालुक्याच्या मुख्यालयातील मौजा एटापल्ली येथे पंचायत समिती एटापल्लीअंतर्गत असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. गेल्या १५ ते २० वर्षांपासून हा पेट्रोल पंप सुरू असल्याचे सांगितले जात असून, येथे येणाऱ्या ग्राहकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या पेट्रोल पंपाची कामकाजाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. मात्र, पेट्रोल पंपावर ग्राहकांसाठी आवश्यक असलेल्या स्वच्छतागृहाची तसेच पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय उपलब्ध नसल्याची तक्रार आहे. पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना आणि प्रवाशांना या सुविधांअभावी गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पेट्रोल पंपावर ग्राहकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध असणे अपेक्षित आहे. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिक, प्रवासी आणि वाहनचालक यांना अशा सुविधांची गरज असते. मात्र, तालुक्याच्या मुख्यालयातील पेट्रोल पंपावरच या सुविधा उपलब्ध नसल्याची बाब नागरिकांमध्ये नाराजी निर्माण करणारी ठरत आहे.
संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी
या प्रकरणाकडे संबंधित पेट्रोल पंप व्यवस्थापन आणि सक्षम प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी. पेट्रोल पंपावर स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आणि ग्राहकांसाठी आवश्यक असलेल्या इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी एटापल्ली तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.
आता संबंधित प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करणार का आणि नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणार का, याकडे एटापल्लीकरांचे लक्ष लागले आहे.
