बुर्गीत ‘गडचिरोली महोत्सव २०२६’चा जल्लोष! मॅरेथॉनसह क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
‘प्रोजेक्ट उडान’अंतर्गत पोलीस मदत केंद्र बुर्गीचा स्तुत्य पुढाकार; युवकांमध्ये क्रीडाभावना, आरोग्यजागृती आणि सामाजिक बांधिलकीचा जागर
गडचिरोली | प्रतिनिधी : सुगत उराडे दि. ३१ ऑक्टोबर २०२६
बुर्गी : ग्रामीण आणि दुर्गम भागातील युवक-युवतींच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्यात क्रीडाभावना, आरोग्याविषयी जागरूकता आणि सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी, या उद्देशाने पोलीस मदत केंद्र बुर्गी (येमली) यांच्या पुढाकारातून ‘गडचिरोली महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले. गडचिरोली पोलीस दलाच्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’ उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट उडान’च्या माध्यमातून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी मॅरेथॉनसह विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला परिसरातील विद्यार्थी, युवक-युवती आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
‘चला, निरोगी आरोग्यासाठी धावूया!’ मॅरेथॉनमधून आरोग्याचा संदेश
युवकांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, आरोग्यविषयक जागरूकता आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, या हेतूने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ‘चला, निरोगी आरोग्यासाठी धावूया!’ हा प्रेरणादायी संदेश देत परिसरातील युवक-युवती आणि नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. निरोगी समाज, सुरक्षित नागरिक आणि सक्षम पोलीस ही संकल्पना या महोत्सवाच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
या महोत्सवात बुर्गी, येमली, करपणफुंडी, गुंडापुरी, बिड्री, मंगुठा, पैमा, कांदोळी, उडेरा, कोंदावाही आणि मरकल आदी गावांतील विद्यार्थी व नागरिकांनी सहभाग नोंदविला. जिल्हा परिषद शाळा बुर्गी, भगवंतराव आश्रमशाळा बुर्गी आणि जय पेरसापेन शाळा बुर्गी येथील विद्यार्थ्यांनीही विविध स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असल्याने सहभागी विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला.
खेळातून व्यसनमुक्ती, एकात्मता आणि सुरक्षित भविष्याचा संदेश
खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून शारीरिक आणि मानसिक विकासाचे प्रभावी माध्यम आहे. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा आणि सकारात्मक सामाजिक उपक्रमांकडे वळावे, आदिवासी संस्कृतीचे जतन करावे तसेच सामाजिक सलोखा व एकात्मता अधिक मजबूत करावी, असा संदेश या महोत्सवातून देण्यात आला. पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचे नाते दृढ करण्यासाठीही हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
पोलीस अधिकारी, कर्मचारी व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला PSI तुषार जाधव, प्रभारी अधिकारी, पोलीस मदत केंद्र बुर्गी (येमली), PSI आशिष पंधरे, ASI टाकळीकर (SRPF-७) तसेच पोलीस मदत केंद्र बुर्गीचे सर्व अंमलदार आणि SRPF ग्रुप-७चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी गाव पोलीस पाटील गोसुजी हिचामी, सामाजिक कार्यकर्ते विनोद हिचामी, सुगत उराडे, ताजने सर, बोरुले सर, कन्नाके मॅडम, कुमरे सर, गावडे सर, मुधोडकर सर, ओंडरे सर, रमेश गावडे, जगदीश दुर्गे, निलेश झाडे, गणेश तलांडी, लुलाजी हिचामी (गाव भूमिया) तसेच टेकाम मेजर, उरेते मेजर, उईके मेजर, दुपारे मेजर आणि गावडे मेजर यांच्यासह जिल्हा पोलीस दलातील पुरुष व महिला कर्मचारी, SRPF जवान आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस-जनता समन्वयातून सामाजिक परिवर्तनाची नवी दिशा
क्रीडा, संस्कृती, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या ‘गडचिरोली महोत्सव २०२६’मुळे बुर्गी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. दुर्गम ग्रामीण भागातील युवकांना आपले कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच पोलीस आणि नागरिकांमधील परस्पर विश्वास, संवाद आणि समन्वय वाढविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या उपक्रमातून होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
आयोजक : पोलीस मदत केंद्र बुर्गी (येमली)
