रन फॉर युनिटी मॅरेथॉनमध्ये गट्टा येथील श्वेता गोठा हिची बाजी; पटकाविला प्रथम क्रमांक!
गडचिरोली पोलीस दलाच्या मॅरेथॉन स्पर्धेत जि.प. उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनीचे घवघवीत यश; प्रमाणपत्र देऊन गौरव
गडचिरोली | एटापल्ली तालुका प्रतिनिधी : श्री. गिरीष डी. नरोटे
एटापल्ली : गडचिरोली पोलीस दल व पोलीस दादालोरा खिडकी यांच्या संयुक्त विद्यमाने एकता दिनाचे औचित्य साधून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘रन फॉर युनिटी – मॅरेथॉन’ स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, गट्टा येथील विद्यार्थिनी कु. श्वेता संदीप गोठा हिने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
या मॅरेथॉन स्पर्धेत श्वेता हिने आपल्या मेहनतीच्या जोरावर अव्वल स्थान मिळवत शाळेसह गट्टा गावाचा नावलौकिक वाढविला. तिच्या या उल्लेखनीय यशाची दखल घेत गडचिरोली पोलीस दलातर्फे तिला प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
श्वेताच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, शाळेचे मुख्याध्यापक श्री. बेडके सर, सर्व शिक्षकवृंद आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने तिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. तसेच तिच्या पुढील शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
दरम्यान, श्वेताच्या या यशाबद्दल गट्टा गावासह परिसरात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही गुणवत्ता आणि जिद्दीची कमतरता नसल्याचे श्वेताने आपल्या यशातून सिद्ध करून दाखविले आहे.
