कोरेपल्लीतील अतिक्रमणधारक शेतकऱ्यांच्या जमिनींची GPS मशीनद्वारे मोजणी सुरू!
वनहक्क दाव्यांच्या प्रक्रियेला गती; उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर वनविभागाकडून प्रत्यक्ष मोजणीला सुरुवात
गडचिरोली | अहेरी तालुका प्रतिनिधी : श्री. गिरीश डी. नरोटे
अहेरी : अहेरी तालुक्यातील मौजा कोरेपल्ली येथील वनजमिनीवर सन २००५ पूर्वीपासून अतिक्रमण करून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोड घडली आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या अतिक्रमित शेतजमिनींची GPS मशीनद्वारे प्रत्यक्ष मोजणी करण्यास वनविभागाने सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वनहक्क दाव्यांच्या प्रक्रियेला आता गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
कोरेपल्ली गावातील अनेक शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सन २००५ पूर्वीपासून वनजमिनीवर शेती करीत आहेत. या शेतकऱ्यांना वनहक्क कायद्यांतर्गत न्याय मिळावा, यासाठी माननीय आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या पुढाकारातून संबंधित शेतकऱ्यांचे वनहक्क दाव्यांचे अर्ज भरून घेण्यात आले होते. सदर अर्ज दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, अहेरी येथे सादर करण्यात आले होते.
त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वनविभागाच्या माध्यमातून संबंधित शेतजमिनींची GPS मशीनद्वारे मोजणी करण्याची कार्यवाही प्रत्यक्ष सुरू करण्यात आली आहे. या मोजणीमुळे शेतजमिनींचे अचूक क्षेत्र निश्चित होऊन वनहक्क दाव्यांच्या पुढील प्रक्रियेस मदत होणार आहे.
यावेळी मोजणी प्रक्रियेदरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव तथा येरमनारचे माजी सरपंच बालाजी गावडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बाबुराव तलांडी, वनहक्क समितीचे अध्यक्ष रामा गावडे, सचिव रैनू गावडे, वनपाल येर्रावार, वनरक्षक पठाण तसेच शेतकरी रवी गावडे, मंगेश कुळमेथे, बिच्यू गावडे, गिला गावडे, राजू गावडे, जोगी गावडे, संभा गावडे यांच्यासह गावातील शेतकरी उपस्थित होते.
अनेक वर्षांपासून वनजमिनीवर शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही मोजणी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. आता मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या वनहक्क दाव्यांवर नियमानुसार सकारात्मक निर्णय होऊन त्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
