सिरोंचा पोलिसांची अवैध दारू वाहतुकीविरुद्ध मोठी कारवाई!
दोन आरोपी अटकेत; कारसपल्ली परिसरातून वाहनासह ८ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त
सिरोंचा | दि. ३ ऑक्टोबर २०२६
सिरोंचा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू वाहतूक व विक्रीविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली. कारसपल्ली परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, दारूसह पांढऱ्या रंगाची डिझायर कार असा एकूण ८ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक गोकुळ राज, अपर पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बी. जे., तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुधाळ यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑक्टोबर रोजी पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुधाळ यांना अवैध दारू वाहतुकीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने कारसपल्लीजवळ रस्त्याच्या बाजूला सापळा रचला. यावेळी MH-33-AD-2130 क्रमांकाची पांढऱ्या रंगाची डिझायर कार संशयास्पदरीत्या येताना दिसली.
पोलिसांनी वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन न थांबवता पुढे नेले. पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर कारसपल्ली येथे वाहन सोडून चालक फरार झाला. दरम्यान, त्याच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीनेही पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने आपले नाव जय क्रिष्णा व्यंकटेश गुंडोजू (वय २९), रा. चेननूर, मंडळ व जिल्हा मंचेरियल, तेलंगणा असे सांगितले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दुसरा आरोपी गणेश सत्यनारायण नुकुम (वय २५), रा. कारसपल्ली, ता. सिरोंचा, जि. गडचिरोली याला अटक करण्यात आली.
पंचांसमक्ष वाहनाची झडती घेतली असता डिझायर कारच्या मागील डिक्कीत किंगफिशर कंपनीच्या ६५० एमएल क्षमतेच्या १५६ बाटल्या, अंदाजे ४६ हजार ८०० रुपये किमतीच्या, आढळून आल्या. तसेच कारसपल्ली येथील एका घरासमोरून किंगफिशर कंपनीच्या ६५० एमएल क्षमतेच्या आणखी ८४ बाटल्या, अंदाजे २५ हजार २०० रुपये किमतीच्या, जप्त करण्यात आल्या.
या कारवाईत दारूच्या बाटल्यांसह सुमारे ८ लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले. अशा प्रकारे एकूण ८ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला.
सदर प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ), ६५ (ई) व ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय कुमार बनकर करीत आहेत.
या कारवाईत पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुधाळ, पोलीस उपनिरीक्षक अजय कुमार बनकर, सहायक फौजदार पिल्लेवार, पोलीस अंमलदार संजय चाबुकस्वार, देवकाते तसेच महिला पोलीस अंमलदार मीना कोरेटिं यांनी सहभाग घेतला.
अवैध दारू वाहतूक व विक्रीविरुद्ध सिरोंचा पोलिसांची कारवाई यापुढेही सुरू राहणार असून, नागरिकांनी अवैध धंद्यांबाबतची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुधाळ यांनी केले आहे.
