जांबिया आश्रमशाळेत शिक्षकांची कमतरता; ८ गावांच्या ग्रामसभेचा आंदोलनाचा इशारा
जांबिया आश्रमशाळेत शिक्षकांची कमतरता; ८ गावांच्या ग्रामसभेचा आंदोलनाचा इशारा
इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंत वर्ग, मात्र कायमस्वरूपी शिक्षक केवळ ५; वसतिगृहातील सुविधांबाबतही ग्रामसभेने उपस्थित केले प्रश्न
गडचिरोली/एटापल्ली | दि. ७ ऑक्टोबर २०२६
तालुका प्रतिनिधी : गिरीश डी. नरोटे
एटापल्ली तालुक्यातील ग्रामपंचायत जांबिया अंतर्गत येणाऱ्या आठ गावांच्या संयुक्त पारंपरिक ग्रामसभेने बुधवारी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, जांबिया येथे अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी शाळेतील शिक्षकांची कमतरता तसेच वसतिगृहातील विविध सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले.
ग्रामसभेच्या म्हणण्यानुसार, जांबिया येथील आश्रमशाळेत इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंत वर्ग असून, कायमस्वरूपी शिक्षकांची संख्या केवळ पाच आहे. इयत्ता १ ली ते ७ वीपर्यंत एकही कायमस्वरूपी शिक्षक नसल्याचा दावा ग्रामसभेने केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत असून, काही विद्यार्थ्यांना व्यवस्थित वाचनही करता येत नसल्याचे ग्रामसभेने निदर्शनास आणून दिले.
इयत्ता ८ वी ते १० वीच्या वर्गांसाठी केवळ तीन शिक्षक, तर इयत्ता ११ वी ते १२ वीच्या वर्गांसाठी दोन शिक्षक कार्यरत असल्याचे ग्रामसभेने सांगितले. शिक्षकांची अपुरी संख्या असल्याने विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण प्रभावित होत असून, परिणामी शाळेची पटसंख्या कमी होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
वसतिगृहातील सुविधांवरही प्रश्नचिन्ह
शाळेच्या मुलींच्या वसतिगृहात अधीक्षिका तर मुलांच्या वसतिगृहात अधीक्षक नसल्याचे ग्रामसभेने सांगितले. मुलींच्या वसतिगृहात गाद्यांची कमतरता, बंद पंखे आणि पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याचेही निदर्शनास आणण्यात आले.
मुलांच्या वसतिगृहात शौचालयांची कमतरता असून, डबल बेडच्या व्यवस्थेमुळे टेबल फॅनची आवश्यकता असल्याचे ग्रामसभेने नमूद केले आहे.
आठ गावांची शिक्षक नियुक्तीची मागणी
जांबिया पंचायत क्षेत्रातील टिटोला, पामजीगुडा, झारेवाडा, जांबिया, मोडास्के, पुस्के, गट्टगुडा आणि अडंगे या आठ गावांच्या ग्रामसभेने तातडीने शिक्षक व वसतिगृह कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.
ग्रामसभेने पुढील मनुष्यबळाची मागणी केली आहे—
प्राथमिक शिक्षक – ७
माध्यमिक शिक्षक – २
ज्युनियर कॉलेज शिक्षक – २
अधीक्षक व अधीक्षिका – २
आठ दिवसांची मुदत; अन्यथा धरणे आंदोलन
शाळेतील शिक्षकांची कमतरता व वसतिगृहातील सुविधांचा प्रश्न आठ दिवसांत सोडविण्यात यावा, अशी मागणी संयुक्त ग्रामसभेने केली आहे. आठ दिवसांत आवश्यक शिक्षकांची नियुक्ती न झाल्यास, आठही गावांच्या ग्रामसभा एकत्रितपणे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार, असा इशारा देण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांचा आणि मूलभूत सुविधांचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी भूमिका आठ गावांच्या संयुक्त पारंपरिक ग्रामसभेने मांडली आहे.
– ८ गाव संयुक्त ग्रामसभा, जांबिया पंचायत क्षेत्र
