आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर! दोडूर आरोग्य केंद्रात डॉक्टर दारूच्या नशेत धिंगाणा; आदिवासी रुग्ण वाऱ्यावर
एटापल्ली / गडचिरोली (प्रतिनिधी – गिरीश डी. नरोटे):
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एटापल्ली तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे चित्र समोर आले आहे. ग्रामपंचायत वगेतूरी अंतर्गत येणाऱ्या मौजा दोडूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कर्तव्यावर असलेला डॉक्टरच दारूच्या नशेत झिंगत असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. ‘पारंपरिक महाग्रामसभा इलाका सुरजागड’च्या प्रतिनिधींनी अचानक दिलेल्या भेटीदरम्यान हा धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आला.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी पारंपरिक महाग्रामसभा इलाका सुरजागड समिती आणि ग्रामसभा दोडूरचे सुमारे २० प्रतिनिधी दोडूर गावातील विविध नागरी समस्या आणि आरोग्य सोयी-सुविधांचा आढावा घेण्यासाठी आरोग्य केंद्रात पोहोचले होते. मात्र, उपकेंद्रात उपचारासाठी आलेल्या आदिवासी रुग्णांना ताटकळत ठेवून कर्तव्यावरील डॉक्टर दारूच्या नशेत गुंग असल्याचे प्रतिनिधींच्या निदर्शनास आले. संबंधित डॉक्टरांच्या तोंडाचा तीव्र वासावरून ते दारू पिऊनच सेवा देत असल्याचे निष्पन्न झाले.
जीव वाचवण्यासाठी नियुक्ती, जीव घेण्यासाठी नाही – महाग्रामसभेचा घणाघात
या प्रकारानंतर ग्रामसभा दोडूर आणि महाग्रामसभेच्या प्रतिनिधींनी तीव्र संताप व्यक्त केला. “अतिदुर्गम आदिवासी भागात डॉक्टरांची नियुक्ती नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी केली आहे, त्यांच्या जिवाशी खेळण्यासाठी नाही. ‘पेसा’ (PESA) कायद्यानुसार स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांवर आणि कारभारावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे. अशा बेजबाबदार आणि व्यसनी कर्मचाऱ्याला तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे,” अशी आक्रमक भूमिका ग्रामसभेने घेतली आहे.
७ दिवसांत कारवाई करा, अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा
या घटनेची गंभीर दखल घेत महाग्रामसभेने गडचिरोलीचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची ७ दिवसांच्या आत सखोल चौकशी करून संबंधित बेजबाबदार डॉक्टरवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निर्धारित मुदतीत कारवाई न झाल्यास सुरजागड परिसरातील ७० गावांतील ग्रामसभांचे नागरिक एकत्र येऊन एटापल्ली तहसील कार्यालयासमोर तीव्र आमरण उपोषण छेडतील, असा निर्वाणीचा इशारा ग्रामसभा दोडूर व महाग्रामसभेच्या वतीने देण्यात आला आहे. या घटनेमुळे गडचिरोली जिल्हा आरोग्य प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे.
