परसलगोंदी येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना सायकल वाटप!
शाळा व्यवस्थापन समिती व गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते उपक्रम; विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
तालुका प्रतिनिधी : गिरीष डी. नरोटे
एटापल्ली : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुका मुख्यालयापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजा परसलगोंदी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना सायकल वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शाळा व्यवस्थापन समिती आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. चंदुलाल गावडे, उपाध्यक्ष श्री. उमेश मटामी, श्री. टिलुजी नरोटी, श्री. राजू मटामी आणि श्री. मिरवा कोवशी यांची उपस्थिती होती. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. पेंदोर सर, श्री. कामडे सर, श्री. मोमीन सर यांच्यासह गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना सायकली उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला मदत होणार असून, शिक्षणासाठी ये-जा करताना होणारा त्रास कमी होण्यास हातभार लागणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारा हा उपक्रम ठरत आहे.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. शाळा व्यवस्थापन समिती आणि गावातील नागरिकांच्या सहभागातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
— त्रिवेणी न्यूज एक्स्प्रेस
