कोंदावाही येथील जय काटी-वेल्ली देवस्थानासाठी वाढीव विद्युत खांब मंजूर करण्याची मागणी
रात्रीच्या पूजाविधीवेळी अंधाराचा त्रास; येमली ग्रामपंचायतीकडे देवस्थान कमिटीचे निवेदन
प्रतिनिधि :— गिरीश नरोटे
एटापल्ली : तालुक्यातील येमली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मौजा कोंदावाही येथील जय काटी-वेल्ली सार्वजनिक देवस्थानापर्यंत वाढीव विद्युत खांब मंजूर करून वीजपुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी देवस्थान कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी येमली ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामसेवक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोंदावाही येथील जय काटी-वेल्ली सार्वजनिक देवस्थान हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून, एटापल्ली, अहेरी, भामरागड, मुलचेरा, सिरोंचा, चामोर्शी आदी तालुक्यांतील नागरिक येथे एकत्र येऊन परंपरेनुसार देवीची पूजा-अर्चा करतात. या देवस्थानात दरवर्षी तीन ते चार वेळा वार्षिक पूजेचे आयोजन केले जाते. तसेच दर तीन आणि सहा वर्षांनी देवीचा मोठा करसाळ महोत्सव अर्थात जत्रा महोत्सव साजरा केला जातो.
मात्र, देवस्थान परिसरात पुरेशी विद्युत व्यवस्था नसल्यामुळे रात्रीच्या वेळी पूजा-विधी व इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करताना भाविकांना अडचणींचा सामना करावा लागतो. परिसरात अंधार असल्याने आवश्यक कामकाज वेळेत पूर्ण करणे तसेच भाविकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे कठीण होत असल्याचे देवस्थान कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर येमली ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व ग्रामसेवकांनी या मागणीसंदर्भात आवश्यक ठराव घेऊन महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा आणि जय काटी-वेल्ली देवस्थानापर्यंत वाढीव विद्युत खांब मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
भाविकांची गैरसोय दूर होणार का?
जय काटी-वेल्ली देवस्थानात विविध तालुक्यांतून मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी प्रकाशव्यवस्था उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन आणि वीज वितरण कंपनी या मागणीची दखल घेऊन सकारात्मक कार्यवाही करणार का, याकडे देवस्थान कमिटीसह भाविकांचे लक्ष लागले आहे.
येमली ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना निवेदन सादर करताना जय काटी-वेल्ली देवस्थान कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
