जज़्बे ज़रा ज़रा थकीत वेतनासाठी वनमजुरांचे आलापल्लीत साखळी उपोषण!
माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी घेतली आंदोलनकर्त्यांची भेट; ACF अविनाश कुमार यांच्याकडून लवकर वेतन अदा करण्याचे आश्वासन
गडचिरोली | अहेरी तालुका प्रतिनिधी : गिरीष डी. नरोटे
आलापल्ली : बल्लारपूर वन विभागांतर्गत आलापल्ली येथील मध्यवर्ती काष्ठ भांडार क्रमांक १ मधील रोजंदारी वनमजुरांचे अनेक महिन्यांचे वेतन थकीत असल्याने संतप्त मजुरांनी उपवनसंरक्षक कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनस्थळी माजी राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्या मजुरांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांनी ACF अविनाश कुमार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून थकीत वेतनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. यावर लवकरच मजुरांचे थकीत वेतन अदा करण्यात येईल, असे आश्वासन ACF अविनाश कुमार यांनी दिले.
बल्लारपूर वन विभागांतर्गत कार्यरत हंगामी मजूर, चौकीदार, गटबांधणी व मोजमाप कामगारांचे वेतन कित्येक महिन्यांपासून प्रलंबित आहे. नियमितपणे काम करूनही मोबदला मिळत नसल्याने या कामगारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन गरजा भागवताना त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अखेर न्याय्य हक्काच्या वेतनासाठी सर्व रोजंदारी वनमजूर एकत्र आले असून त्यांनी लोकशाही मार्गाने साखळी उपोषण सुरू केले आहे.
‘थकीत वेतन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही!’
आम्ही केलेल्या कामाचा मोबदला मिळणे हा आमचा हक्क आहे. त्यामुळे थकीत वेतन अदा केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका वनमजुरांनी घेतली आहे. अनेक महिन्यांपासून वेतन मिळत नसल्यामुळे कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालून प्रलंबित वेतन अदा करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयापासून वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पाठपुरावा
वनमजुरांच्या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी उपोषणस्थळी भेट दिली. यापूर्वीही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी अनिरुद्ध पालकर यांच्याशी या विषयावर चर्चा करून पाठपुरावा केला होता. त्यानंतर आता ACF अविनाश कुमार यांच्याशी संपर्क साधून थकीत वेतनाबाबत चर्चा केली. यावेळी लवकरच वेतन अदा करण्याचे आश्वासन मिळाल्याने वनमजुरांमध्ये काही प्रमाणात आशा निर्माण झाली आहे.
मात्र, केवळ आश्वासन न देता प्रत्यक्षात वेतन कधी जमा होणार, याकडे आता सर्व कामगारांचे लक्ष लागले आहे. कामगारांनी केलेल्या मेहनतीचा मोबदला वेळेवर मिळणे आवश्यक असताना त्यासाठी साखळी उपोषण करण्याची वेळ येणे ही बाब चिंताजनक मानली जात आहे.
आश्वासनाची अंमलबजावणी कधी?
वनमजुरांच्या प्रलंबित वेतनाचा प्रश्न तातडीने निकाली काढून त्यांच्या कुटुंबांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर ACF यांनी दिलेल्या आश्वासनामुळे तोडगा निघण्याची अपेक्षा निर्माण झाली असली, तरी प्रत्यक्ष वेतन मिळेपर्यंत वनमजुरांचे आंदोलन आणि प्रतीक्षा कायम राहणार आहे.
यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
